लहू चव्हाण
पाचगणी : सांघिक व वैयक्तिक क्रीडास्पर्धामधून नेतृत्वगुण आणि सहकार्याची भावना वाढीस लागते. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात क्रिडा स्पर्धांमध्ये भाग घेतल्यास यातूनच भविष्यातील खेळाडू निर्माण होतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी केले.
भिलार येथे हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या, हिलरेंज हायस्कुल, हिलरेंज माध्यमिक विद्यालय आणि कै. एम.आर.भिलारे हायस्कूल राजपुरी या विद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक क्रिडा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी कोळेकर बोलत होत्या.
यावेळी वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जाणवे-खराडे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, पंचायत समितीचे माजी सभापती संजय गायकवाड, सरपंच शिवाजी भिलारे, हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन भिलारे, राजेंद्र भिलारे,प्रवीण भिलारे, सुरेंद्र भिलारे, विस्तार अधिकारी वालेकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष भूषण बोधे, तलाठी शशिकांत वणवे, राम गोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मनाची सुदृढता ही पुस्तकी ज्ञानातून तर शरीराची सुदृढता खेळ आणि व्यायामातून होते. त्यामुळे शालेय जीवनात या दोन्हीचा मेळ आवश्यक आहे तो साधण्याचा प्रयत्न शिक्षक आणि विद्यार्थी करीत आहेत हे कौतुकास्पद आहे, नितीन भिलारे बोलताना म्हणाले.
या वेळी शीतल जाणवे-खराडे,राजेंद्र राजपुरे, संजय गायकवाड, राजेंद्र भिलारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी कार्यक्रमात संचलन, योगासने, मल्लखांब, लेझीम, कवायती इत्यादी प्रकाराचे सादरीकरण करण्यात आले.त्यानंतर विविध क्रीडाप्रकारात नैपुण्य मिळविलेल्या खेळाडूंना गौरविण्यात आले.
पाहुण्यांचे स्वागत जतीन भिलारे आणि तेजस्विनी भिलारे यांनी केले. प्रस्ताविक मुख्याध्यापक प्रकाश बेलोशे, सूत्रसंचालन वैशाली भिलारे आणि महेश ननावरे यांनी तर आभार सुनील गुरव यांनी मानले.