यवत : कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत कार्यरत केमिकल कंपन्यांमध्ये अपघात व प्रदूषणाच्या अनेक घटना घडल्या असून डिसेंबर 2024 मध्ये एका केमिकल कंपनीत रेसिड्यू टँक फुटल्याने गंभीर जखमी झालेल्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वीही कुरकुंभ एमआयडीसीमधील विविध कंपन्यांमध्ये अनेक अपघात, प्रदूषणाच्या घटना समोर आल्या आहेत. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दौंडचे आमदार राहुल कुल यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. या अनुषंगाने आज कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग, कामगार आणि पर्यावरण विभागाची संयुक्त बैठक पार पडली यावेळी कुरकुंभ एमआयडीसी येथील कंपन्यांमध्ये अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि त्या उपाययोजनांची माहिती दिली.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर घातक वायू व पदार्थ साठवले जातात.त्या सर्व उद्योग घटकांचे नामांकित संस्थेद्वारे सुरक्षा ऑडिट करावे व आवश्यक कठोर उपाययोजना कराव्यात. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतून केमिकलयुक्त सांडपाणी, घातक कचरा नियमबाह्य पद्धतीने सोडले जात असल्याच्या तक्रारी गेल्या काही काळात वारंवार प्राप्त झाल्या असून यामुळे परिसरातील ४-५ किमी अंतरातील पाण्याचे स्रोत, भूगर्भातील पाणी देखील दूषित झाले आहे याबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने दोषी उद्योगांवर कठोर कारवाई करावी असे सांगण्यात आले.
तसेच MPCB कडून सर्व कंपन्यांचे ZLD संयंत्रांची तपासणी व पाण्याचे नमुने घेऊन परीक्षण करावे, नामांकित संस्था (NEERI, IIT, ICT) यांच्या माध्यमातून पाण्याचा ऑडिट करावे व योग्य कार्यवाही करावी. प्रदूषण नियंत्रणासाठी CETP (कॉमन एफ्ल्युएंट ट्रीटमेंट प्लांट) कार्यरत आहे, मात्र त्याच्या कार्यक्षमतेबाबत वारंवार शंका उपस्थित झाल्या आहे यासाठी आवश्यकतेनुसार CETP च्या निकषांमध्ये बदल करावेत योग्य यंत्रणेमार्फत तो कार्यान्वित करावा.कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कंत्राटी कामगारांना असमान वेतन,नोकरीची असुरक्षितता,सुविधांचा अभाव, कामाचे जास्त तास आदी समस्यांबाबत कामगार कायद्यानुसार कार्यवाही करावी यासारख्या विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली असून मंत्री महोदयांनी या सर्व मुद्द्यांवर सकारात्मकता दर्शवली असून, पुढील जॉईंट कमिटी MIDC, MPCB व इतर संबंधित अधिकारी यांच्या संयुक्त कमिटी स्थापन करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.
या बैठकीसाठी कामगार विभागाचे दिपक पोकळे, अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिस, अधीक्षक अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ निलेश मोढवे, महाराष्ट्र प्रदूषण नियमन मंडळ पुणेचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंके, क्षेत्रीय अधिकारी जयंत डोके, सहसंचालक अखिल घोगरे, मुख्य अभियंता MIDC पुणेचे नितीन वानखेडे आदि उपस्थित होते.