पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी आज (दि.26) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघ आहेत. मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक, तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ या 4 जागांकरिता मतदान पार पडणार आहे. त्यासाठी आज सकाळी सात वाजता मतदान सुरु झाले आहे. या जागांवर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. या निवडणुकीतही अनेक आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने भाजपच्या उमेदवारांनी पैसे वाटप केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाने या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. आज सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार असून या निवडणुकीत कोण बाजी मरणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
असे आहे लढतींचे चित्र
– मुंबई पदवीधर : किरण शेलार (भाजप महायुती), विरुद्ध अनिल परब (महाविकास आघाडी).
– कोकण पदवीधर : निरंजन डावखरे (भाजप महायुती), विरुद्ध रमेश कीर (महाविकास आघाडी).
– मुंबई शिक्षक : शिवनाथ दराडे (भाजप), शिवाजी शेंडगे (शिवसेना), शिवाजी नलावडे (राष्ट्रवादी), ज. मो. अभ्यंकर (उबाठा), सुभाष मोरे (शिक्षक भारती).
– नाशिक शिक्षक : किशोर दराडे (शिवसेना महायुती), संदीप गुळवे (महाविकास आघाडी), विवेक कोल्हे (अपक्ष).