Political | पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. त्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. आरोपप्रत्यारोपांची चिखळफेक केली जात आहे. अशातच हवेली तालुक्यातील बहुतांशी सोसायटी, ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. त्यामुळे उघड प्रचार केल्याने भाजपला कोणी निवडून देणार नाही.
त्यामुळे विकास दांगट यांना पुढे करून भाजप बाजार समितीमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलचे नेते प्रदीप गारटकर यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे आता चांगलेच राजकारण तापणार असल्याचे बोलले जात आहे.
यावेळी आमदार सुनील टिंगरे, दिलीप बराटे, प्रकाश म्हस्के यांच्यासह अन्य उमेदवार उपस्थित होते.
हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल व अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी यांच्यामध्ये जोरदार लढत रंगणार असल्याने एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप केले जात आहेत. गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या बाजार समितीमध्ये प्रथमच सर्वपक्षीय पॅनेलमधून आव्हान निर्माण केले आहे. एकप्रकारे राष्ट्रवादीला राष्ट्रवादीचेच आव्हान असल्याचे चित्र असल्याचे स्पष्ट होत आहे.
बाजार समितीची ही निवडणूक न्यायालयाच्या आदेशाने लागली आहे. हे लोक नेत्यांची दिशाभूल करीत जनतेचीही दिशाभूल करीत आहेत, असा आरोप विकास दांगट यांनी केला.