मुंबई : राज्यात आता पेट्रोल, डिझेलच्या दरावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल ३ रुपये प्रति लिटरने स्वस्त झाले आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर १० हजार कोटींचा बोझा पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेतील विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल, डिझेल दर आणखी कमी करण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी कमी केल्यानंतर राज्य सरकारने व्हॅट कमी करावा अशी मागणी सातत्याने त्यावेळी विरोधात असलेल्या भाजपकडून करण्यात येत होती. मात्र, त्यावेळी राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने व्हॅट कमी करण्यास नकार दिला होता.
शिंदे-फडणवीस सरकारने आजच्या कॅबिनेट बैठकीत हा मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्यातील जनतेला आणि मालवाहतूकदारांनाही दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. केंद्र सरकारने कर कपात केल्यानंतर राज्यांनीदेखील करात कपात करावी असे आवाहन केले होते. काही राज्यांनी याला प्रतिसाद देत कर कपात केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेदेखील राज्याच्या करात कपात केली आहे. कर कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवर १० हजार कोटींचा बोझा पडणार आहे. ही तूट भरून काढण्यासाठी कोणत्याही विकासकामाच्या खर्चाला कात्री लावणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी इंधनदर कपात केल्याचं म्हटलं. यावेळी फडणवीस यांनी आणीबाणीच्या काळात कारागृहात गेलेल्या लोकांसाठीची पेन्शन योजना पुन्हा सुरू करणार असल्याचं म्हटलं. महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळातील आर्थिक अडचणीचं कारण देत ही पेन्शन योजना बंद केली होती.