Pachgani News : पाचगणी : सुरुर-पोलादपूर राज्य मार्गावर पाचगणीनजीक भोसे खिंडीजवळ रस्त्याच्या कडेला वठलेल्या झाडाची फांदी प्रवाशांना धोकादायक ठरत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग व महसूल विभागाचे अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलून नामानिराळे झाले आहेत. धोकादायक फांद्यांची टांगती तलवार नागरिकांच्या डोक्यावर असतानाही संबंधित विभागाच्या मस्तवाल अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा शासनाला कधी कळणार, असा संतप्त सवाल पाचगणीकर विचारत आहेत.
धोकादायक फांद्यांची टांगती तलवार नागरिकांच्या डोक्यावर
मुख्य रस्त्यावर असणाऱ्या मनामा फॅक्टरीसमोरील एका वठलेल्या झाडाची फांदी धोकादायक झाल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे वृत्त ‘पुणे प्राईम’ने २९ मे रोजी प्रसिद्ध केले होते. परंतु संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची अद्यापही दखल न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Pachgani News) सध्या पावसाळा सुरू आहे. पावसात मनसोक्त भिजण्यासाठी व निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी निसर्गप्रेमी, पर्यटकांची वर्दळ सुरू असते. दुचाकी, चारचाकीमधून मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत.
दरम्यान, धोकादायक बनलेल्या या झाडाच्या बाजूला जॅम शॉप व इतर मातीच्या भांड्यांची दुकाने व मनामा जॅम फॅक्टरी असल्याने या परिसरात पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. (Pachgani News) या धोकादायक फांदीची टांगती तलवार नागरिकांच्या डोक्यावर असतानाही याचे कसलेही सोयरसुतक संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना नसल्याचे दिसून येत आहे.
आजवर झाडाच्या धोकादायक फांद्या घरावर, गाड्यांवर पडल्याने माणसे दगावल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. ही वस्तूस्थिती असतानाही संबंधित विभागाचे अधिकारी खुशाल डोळेझाक करत आहेत. यामुळे नागरिकांच्या रोषाला बांधकाम विभागाला सामोरे जावे लागत आहे. (Pachgani News) अधिकारी गंभीर दुर्घटना घडण्याचीच वाट पाहत आहेत का? गंभीर घटना घडल्यावरच कारवाई होणार आहे का, असे प्रश्न नागरिक, प्रवासी व दुकानदारांकडून विचारले जात आहेत.