लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा निरोप देत जड अंत:करणाने पाचगणी शहर व परिसरातील पाच दिवसांच्या घरगुती गणपती व गौरीचे आज (शनिवारी) विसर्जन करण्यात आले. विसर्जनासाठी टेबललॅंड पठारावरील तलाव गर्दीने फुलून गेला होता.
गेल्या पाच दिवसांपासून भक्तिमय वातावरणात घरोघरी श्रींची स्थापना करण्यात आली होती. शनिवारी पाचव्या दिवशी गणपतीसह गौरीचे विसर्जन करण्यात आले. सकाळपासूनच घरगुती गणपतीचे पूजन करण्यात येऊन निरोप देण्यात भक्तगण गुंतले होते. (Pachgani News ) विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पाचगणी पोलीसांनी योग्य नियोजन केले होते. त्यामुळे भाविकांना विसर्जन मार्गावर कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका कर्मचाऱ्यांनी विसर्जनासाठी जय्यत तयारी केली होती.
गणपतींची विधिवत पूजा, आरती झाल्यानंतर टेबल लँडवरील तळवीत (तलाव) मूर्ती विसर्जन करण्यासाठी आणल्या. त्या गणेशमूर्ती पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे विसर्जनासाठी सुपूर्द केल्यानंतर हे कर्मचारी तराफ्याच्या सहाय्याने तलावातील पाण्यात मधोमध नेऊन विसर्जन करत होते. (Pachgani News ) याकामी पालिका कर्मचारी सूर्यकांत कासुर्डे, बाबू झाडे, अफजल डांगे, सागर बगाडे, शहानवाज शेख, जगदीश बगाडे, आनंद चव्हाण हे कर्मचारी दिवसभर परिश्रम घेत होते. गौरी विसर्जनासाठी सकाळी सहा वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंतचा मुहूर्त असल्याने भक्तगणांनी आपल्या सोयीनुसार गौरी विसर्जन केले.
पालिकेच्या मदतीला पाचगणी रोटरी क्लब
पाचगणी पालिकेच्यावतीने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाला प्राधान्य देण्यात आले होते. पालिकेच्या जोडीला पाचगणी रोटरी क्लबही सरसावला असून, रोटरी क्लबच्या वतीने टेबल लँडवरील तळ्यांच्या शेजारी निर्माल्य कलश ठेवण्यात आला होता. यामध्ये नागरिकांनी पूजेचे साहित्य, निर्माल्य टाकून पालिका व रोटरीच्या आवाहनाला १०० टक्के प्रतिसाद दिला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : गोंदवले येथील राज्यस्तरीय नाट्य महोत्सवात साताऱ्याच्या ‘पौर्णिमा’ची बाजी
Pachgani News : ‘पाचगणी’ सोसायटीने नागरिकांना उन्नतीची संधी दिली- आशिष दवे