उल्हासनगर : तीन वर्षीय चिमुकलीची हत्या करुन मृतदेह जाळल्याची संतापजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. उल्हासनगरमध्ये गुरुवारी ही घटना घडली आहे. भयंकर बाब ही की मुलीच्या मामानेच ही हत्या केली असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या तपासात ही माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या मामाला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उल्हासनगरच्या कॅम्प ५ प्रेमनगर टेकडी परिसरात ही घटना घडली आहे. तिची आई आणि दोन बहिणी येथे राहत होत्या. सोमवारी सकाळी खेळता खेळता मामाने तिला एक फटका मारला. मात्र, हा फटका खूप जोरात बसल्यामुळे ती मुलगी ओट्यावर जोरात आदळली. यामुळे मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामध्ये मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर मामा खूप घाबरून गेला. मुलीचा मृतदेह त्याने लपवून ठेवला. बुधवारी मतदानाच्या दिवशी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी झाडाझुडपात मृतदेह नेऊन तो जाळून टाकला.
गुरुवारी पोलिसांनी मुलीचा तपास करण्यास सुरुवात केली. मुलीची शोधाशोध केल्यानंतर मुलीचा मामा हा पत्नी आणि एका मित्रासह प्रेमनगर टेकडीवर पोहोचला. मामानेही मुलीला शोधण्याचे नाटक केले. त्यानंतर ज्या ठिकाणी मुलीला जाळले होते. त्याचठिकाणी रिक्षाचालक मित्राला मुलीला शोधण्यासाठी पाठवले. स्वतः पत्नीसह दुसऱ्या भागात मुलीला शोधण्यासाठी गेले. यादरम्यान, रिक्षाचालकाला मुलीचा मृतदेह सापडल्याने त्यानं याबाबत माहिती पोलिसांना आणि मुलीच्या कुटुंबियांना दिली.
मात्र, हा प्रकार पोलिसांना संशयास्पद असल्याचे दिसून आले. यामुळे त्यांनी रिक्षाचालक आणि मुलीच्या मामाला ताब्यात घेतले. मुलीच्या मामाला आणि रिक्षाचालकाला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर मामाने स्वतः गुन्हा कबूल केला. मात्र, या हत्त्येचा कोणताही उद्देश नव्हता. अनावधानाने भाचीला जोरात फटका बसला त्यात तिचे डोकं जोरात आदळले. यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे आपण घाबरलो असून तिचा मृतदेह लपवला. भाचीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, अशी कबुली आरोपी मामाने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी न्यायालयासमोर हजरं केलं असल्याची माहिती दिली आहे. उल्हासनगरचे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी ही माहिती दिली.