पुणे : पुणे जिल्ह्यात आज ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदारसंघात, तर मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्यापार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुका खुल्या, मुक्त, शांतता, निर्भय व निःपक्षपाती वातावरणात पार पडाव्यात. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक टप्यातील मतदानाच्या दिवशी निर्धारित केलेल्या वेळेच्या ४८ तास आधीपासून ते मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस पाळावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत, तसेच मावळ, पुणे व शिरूर लोकसभा मतदारसंघात ११ मे रोजी सायंकाळी ६ पासून १३ मे रोजी सायंकाळी ६ पर्यंत, तसेच ४ जून रोजी संपूर्ण दिवसासाठी हे आदेश लागू राहतील.
निवडणूक निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी, विदेशी, बिअर, वाइन निर्माणी अनुज्ञप्तीधारक बंदच्या कालावधीत उत्पादन करू शकतील. मात्र, या कालावधीत कोरडा दिवस लागू असलेल्या क्षेत्रातील अनुज्ञप्तीधारकांना देशी, विदेशी मद्याचा पुरवठा करता येणार नाही. तसेच, ठोक मद्यविक्रीच्या अनुज्ञप्तींनी कोरडा दिवस लागू असलेल्या क्षेत्रातील अनुज्ञप्तीधारकांना मद्याचा पुरवठा करता येणार नसल्याच आदेशात म्हटलं आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम १९४९ व त्याअंतर्गत लोकप्रतिनिधित्व अधिनियमन १९५१ अंतर्गत तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे.