बीड : नऊवारी साडी नेसून आईने सिंगापूरमधील लेकाच ऑफिस पाहिल्यानंतर आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले . ही घटना बीड जिल्ह्यातील असून मुलगा दत्तात्रय जाधव याने लिहिलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.
लहानशा खेड्यात आईने आयुष्यभर कष्ट केले. तिने कधी विमान पाहिले नव्हते, आता विदेशातले लेकाचं जग, ऑफिस पाहून तिच्या नजरेत अभिमान, आनंद आहे. मी सगळ्यांना एकच सांगतो, आपल नवीन जग, विदेश आपल्या पालकांनाही दाखवा, त्यांना होणारा आनंद मोजतानाही येणार!’ असे लिंकडीन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलेल्या लहानशा पोस्टमध्ये दत्तात्रय जाधव याने सांगितले आहे.
भोगलगाव ते सिंगापूर, शेतमजुरी ते ब्लॉकचेन हा प्रवास दत्तात्रय जाधवसाठी सोपा नव्हता.पण, तो करतानाच त्याच्या मनात होत की, आपण जी काही प्रगती करू त्यात आपलं कुटुंब, आपली आई आपल्यासोबत हवी. तो दहावीत असतानाच वडील गेले, पण भाऊ, आई यांच्या साथीनं त्यानं आपल्या जगण्याला मेहनतीची चाकं लावली. आज ब्लॉकचेन तज्ज्ञ असलेला दत्तात्रय सिंगापूरमध्ये नोकरी करतो.
याबाबत बोलताना दत्तात्रय जाधव म्हणाला कि, अजूनही मला भोगलगावातील दिवस आठवत आहेत. आमची चार एकर जमीन आणि वडील- भाऊ-आई हे शेतमजुरी करीत होते. गोदावरीला पाणी नाही, पाऊस नाही. यामुळे शेती व्यवसाय खूप अडचणीत आला होता. त्यामुळे मला एकच माहिती होते. आपल्याला परिस्थिती बदलायची आहे. जर परिस्थिती बदलायची असेत तर आपल्याला मेहनत, अभ्यासच करायला हवा.
बीसीएसचे शिक्षण औरंगाबादला पूर्ण केल्यानंतर , काही क्लासेस हैदराबादला लावले. आणि मला चांगली नोकरी मिळाली. पण, आईला तेव्हा हैदराबादलाही नेता आले नाही. पण, पुढे पुण्यात नोकरीला लागलो आणि मी आईला सोबत घेऊन गेलो. मनात एकच होते, सुखाचे दिवस आले तर आईसोबत हवीच. पत्नीही मला समविचारी मिळाली आणि सिंगापूरला नोकरी लागली आणि इथं स्थिरावताच मी आईला सिंगापूरला घेऊन आलो.
दरम्यान, दत्तात्रय ब्लॉकचेनसह हॅकिंग विषयातला तज्ज्ञ आहे. त्यानं आजवर अनेक हॅकॅथॉन जिंकले आहेत. शेतकऱ्यांचे जगणे सुकर व्हावे. म्हणून काही सॉफ्टवेअर बनविण्याचे त्याच्या मनात आहे. आपली प्रगती, आपले बदललेले जग आणि त्याचा आनंद आई- वडिलांच्या डोळ्यांत पाहण्यासारखा आनंद जगात कोणताही नाही.