नवी दिल्ली : मध्य प्रदेशात निवणूकीचा प्रचार शिगेला पोहचला असून १७ नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपल्या विजयाचे दावे प्रती ददावे करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप, काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रचारसभांचा धडाका सुरु झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिग्गज स्टार प्रचारक आहेत. दोन्ही नेते प्रचारसभेत एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. दरम्यान बैतूल येथे मोदींच्या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींचा उल्लेख ‘मूर्खो का सरदार’ असा केला आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा पंतप्रधान मोदी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
मोदी म्हणाले, मी ऐकलं आहे की, एक महाशय म्हणत होते, भारतातील सर्व नागरिंकाकडे चायना मेड मोबाईल आहेत. एका महाज्ञानीला वाटत आहे, की सर्व लोकांकडे चाईनाचे मोबाईल आहे. अरे मूर्खो के सरदार, कोणत्या जगात राहतात हे लोक. आपल्या देशाची कर्तृत्वाची माहिती न पाहण्याचा मानसिक आजार काँग्रेस नेत्यांना झाला आहे. त्यांनी विदेशातील कोणते चष्मे घातले आहेत माहित नाही.
त्यांना आपल्या देशाचा विकास दिसतच नाही, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे. आज भारत जगातील मोबाईलचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक आहे. काँग्रेसचे केंद्र सरकार असताना भारतात दरवर्षी 20 हजार रुपयांपेक्षा कमी मोबाइल फोन तयार होत होते, मात्र आज भारतात 3.5 लाख कोटी रुपयांहून अधिक मोबाइल फोन तयार होतात. असंही मोदी सांगायला विसरले नाहीत.
काँग्रेसच्या पंजाला केवळ लुटणेच माहीत
पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले, आपण उद्या आदिवासी गौरव दिनानिमित्त बिरसा मुंडा यांच्या भूमीवर जाणार आहे. आम्ही सरकारची तिजोरी गरिबांसाठी खुली केली आहे. काँग्रेसच्या पंजाला फक्त लुटायचंच माहीत आहे. उद्या आदिवासी गौरव दिनानिमित्त भाजप चोवीस हजार कोटी रुपयांची मोठी योजना सुरू करणार आहे. हा तोच काँग्रेस पक्ष आहे, ज्या पक्षाला वाटायचं राम मंदीर होणारच नाही, पण अयोध्येत भव्य मंदिराचे बांधकाम पूर्ण होत आहे. आम्ही जे करतो, ते करूनच दाखवतो, असंही मोदी म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते राहुल गांधी?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हरदा येथील प्रचारसभेत ‘मेड इन चायना’चे ‘मेड इन मध्य प्रदेश’ करा असं वक्तव्य केलं होतं. आपण मेड इन चायना वस्तू मोठ्या प्रमाणावर वापरतो. पण आपल्याला या सर्व वस्तू मेड इन मध्य प्रदेश करायच्या आहेत. वस्तूंवर मेड इन मध्य प्रदेश लिहिलेलं आपल्याला बगायचं आहे. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही हेच काम करणार आहे. राज्यात बेरोजगारी राहणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करु, असं राहुल गांधी म्हणाले होते.