जळगाव : बैलांना पाणी पाजत असताना पाय घसरुन नदीपात्रात बुडालेल्या ईश्वर सोमा कोळी (वय ३२, रा. खेडी खुर्द, ता. जळगाव) या तरुण शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. दुसऱ्या दिवशी तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आल्यानंतर त्याला बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील खेडीकढोली गावात ईश्वर कोळी हा तरूण आईवडील, भाऊ व वहिनी यांच्यासोबत वास्तव्यास होता. शेतीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करीत होता. खेडी खुर्द शिवारातील गिरणा नदी काठावर त्यांचे शेत असून तो नेहमीप्रमाणे सोमवार २६ ऑगस्ट रोजी शेतात गेला असताना दुपारच्या सुमारास बैलांना पाणी पाजण्यासाठी गिरणा नदीच्या काठावर गेला. मात्र त्याचा पाय घसरुन तो नदीपात्रात पडला. यावेळी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, शेतातील दोन्ही बैल हे सायंकाळच्या सुमारास घरी आले. परंतु, ईश्वर कोळी हा त्यांच्यासोबत नव्हता. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्याचा रात्री उशीरापर्यंत सर्वत्र शोध घेतला. परंतु कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर दुसऱ्या दिवशी मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता गिरणा नदीपात्रात ईश्वरचा मृतदेह आढळून आला. ईश्वरचा मृतदेह पाण्यात आढळून आल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.