सातपूर : सातपूर कॉलनी परिसरात गेल्या महिनाभरापासून घराबाहेर वाळत घातलेल्या साड्या चोरी करणाऱ्या चोरट्याला परिसरातील सजग नागरिकांच्या मदतीने पकडण्यात यश आले. नागरिकांनी संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. साडी चोरी करणाऱ्या संशयिताचा व्हिडीओ सीसीटीव्हीतही कैद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातपूर कॉलनी भागातील श्रीकृष्णनगर, समतानगर परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून चाळीस ते पन्नास साड्या चोरीला गेल्याची घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास किंवा रात्रीच्या वेळी घराबाहेर वाळत घातलेल्या साड्या अचानक गायब होत असल्यामुळे महिलांमध्ये संताप व्यक्त होत होता. घराबाहेरील साड्यांसह लॉण्ड्रीच्या बाहेर वाळत घातलेल्या साड्यांवरही चोरट्यांने डल्ला मारल्याने या परिसरातील महिला आणि व्यावसायिकांचीही चिंता वाढली होती.
दरम्यान, चोरीस गेलेल्या साड्या काही दिवसानंतर पुन्हा त्याच ठिकाणी फेकून देण्याचेही प्रकार समोर येत असल्याने महिलांमध्ये उलट सुलट चर्चेला उधाण आले असतानाच शुक्रवारी रात्रीच्या वेळी एक संशयित युवक साडी चोरी करताना काही नागरिकांना दिसला. हा प्रकार परिसरातील सीसीटीव्हीतही कैद झाला. नागरिकांनी संशयितास साडी चोरताना रंगेहाथ पकडून सातपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो श्रीकृष्णनगर येथे भाडेकराराने रहात असल्याची माहिती समोर आली असून त्याने साडी नेसण्यासाठी या साड्याची चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, साडी चोरणारा संशयित विकृत मनोवृत्तीने साड्यांची चोरी करीत असल्याचे सांगितले जात आहे.