करंजी : नगर तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिकेविरोधात निवडुंगे (ता. पाथर्डी) येथील एका महिलेने गंभीर स्वरूपाचे आरोप करत या शिक्षिकेवर कारवाई करावी अन्यथा गुरुवार (दि.२०) फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा महिलेने जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

याबाबत स्मिता अनिल ढोले या महिलेने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद अहिल्यानगर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर तालुक्यातील प्राथमिक शाळेच्या एका शिक्षिकेने माझ्या पती बरोबर गुपचूप विवाह केला, त्यानंतर शाळेवर हजर असल्याचे दाखवून सोलापूर येथील एका हॉस्पिटलमध्ये प्रस्तुती करून एका मुलाला जन्म दिला. त्यावेळीदेखील प्रशासनाची फसवणूक केली. संबंधित महिला शिक्षिका विवाहित असून, घटस्फोटीत असल्याचे कागदपत्रे सादर करून सोलापूर जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यात स्वतःची आंतरजिल्हा बदली करून घेतली.
ग्रामसभेचा ठराव नसताना मुख्यालयी राहत असल्याचे खोटे स्वयंघोषणापत्र दाखल करून घरभाडे भत्ता घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सदर महिला शिक्षिकेची बदली तत्काळ रद्द करण्यात यावी. तसेच शिक्षण विभागाला खोटी माहिती दिल्याने फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या प्रमुख मागणीसाठी स्मिता ढोले या महिलेने गुरुवार (दि. २०) रोजी जिल्हा परिषदेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.








