चांदवड (नाशिक) : उकाडा होत असल्याने रात्री दरवाजा उघडा ठेवून घरात झोपलेल्या महिलेवर बिबट्याने अचानक जीवघेणा हल्ला केला. यावेळी झोपेतून जागे होताच महिलेने बिबट्याच्या रूपात यमदूतच समोर दिसला. अशा परिस्थितीत त्या घाबरल्या, पण, त्यांनी हिंमत सोडली नाही. आरडाओरड करत आपल्या बचावासाठी त्यांनी बिबट्याशी थेट दोन हात केले. जवळ कोणतेही साधन नसताना त्यांनी हाता-पायांनी प्रतिकार करीत बिबट्याला अक्षरशः हुसकावून लावले. प्रसंगावधान राखून दाखविलेल्या धाडसामुळे बिबट्याच्या हल्ल्यातून सुमनबाईचा जीव वाचला. यात मानेला, पाठीला व पायाला गंभीर जखमा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू आहेत. चांदवड येथील कोंबडवाडी भागात रविवारी (दि. ६) रात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
इंद्राईवाडी, राजदेरवाडी (ता. चांदवड) येथील रहिवासी असलेल्या सुमनबाई त्र्यंबक बड़े (५८) या चांदवड शहरातील कोंबडवाडी भागात राहणारे भागवत विठ्ठल जाधव यांच्याकडे आलेल्या होत्या. सोमवारी रात्री त्या जाधव यांच्या मालकीच्या गट नंबर ७४७ मधील घरामध्ये दरवाजा उघडा ठेवून झोपलेल्या होत्या, तर भागवत जाधव हे घराबाहेर झोपलेले होते. उकाड्यामुळे झोपताना त्यांनी घराचा दरवाजा उघडा ठेवला होता. यादरम्यान, रात्री बिबट्याने अचानक घरात प्रवेश करून झोपलेल्या सुमनबाई बर्डे यांच्यावर हल्ला केला, यावेळी त्यांनी आरडाओरड केला.
बिबट्याचा हल्ला परतवून लावण्यासाठी जवळ कोणतेही साधन नव्हते. त्यामुळे हाता-पायांनी प्रतिकार करणे, हा एकच पर्याय त्यांच्याकडे होता. यावेळी प्रसंगावधान राखत हिमतीने त्यांनी बिबट्याला जोरात लाथ मारली. त्याच्या डोक्यावर जोरात बसलेली लाथ यामुळे हल्ल्यातून माघार घेत बिबट्या तेथून पसार झाला. या घटनेत बिबट्याने ओरबाडल्याने त्यांच्या मानेला, पाठीला व पायाला जखमा झाल्या आहेत. त्यांना औषधोपचारासाठी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.