नाशिक: नाशिकमधील सेक्स स्कॅन्डल प्रकरणाने आता धक्कादायक वळण (Nashik News) घेतले असून, खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या व्यावसायिकावरच लैंगिक शोषण आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा (Crime News) नोंदवण्यात आला आहे. रवींद्र एरंडे असे या आरोपीचे नाव असून, त्याने नोकरीचे आमिष दाखवत एका महिलेचे वारंवार शोषण केल्याचा गंभीर आरोप आहे. (Latest Marathi News)

तक्रारीनुसार, आरोपी स्वतःला कधी पत्रकार तर कधी ज्योतिषी म्हणून सादर करत होता. तो महिलांना व्यवसाय सुरू करून देण्याचे मार्गदर्शन करत असल्याचे सांगत विश्वास संपादन करत असे. याच माध्यमातून त्याची पीडितेशी ओळख झाली. पीडित महिलेच्या मुलाला सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत त्याने तिच्याशी जवळीक साधली.
“तुमचं भविष्य उज्ज्वल करून देतो,” असे सांगत आरोपीने तिला नाशिक आणि इगतपुरी परिसरातील हॉटेलमध्ये नेले आणि तेथे वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. विश्वास आणि अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत आरोपीने महिलेला जाळ्यात ओढल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमीही तितकीच धक्कादायक आहे. काही दिवसांपूर्वी आरोपीने हार्ड डिस्क चोरीची तक्रार केली होती. तपासात त्याच्याच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी हार्ड डिस्क चोरून त्यातील 100 हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओंच्या आधारे त्याला ब्लॅकमेल करत 12 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे उघड झाले. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेतले आहे.
मात्र पुढील तपासात आरोपीवरच लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप समोर आले. जप्त हार्ड डिस्कमध्ये 2003 ते 2024 दरम्यानचे 121 हून अधिक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याने प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या घटनेतून नोकरी, भविष्य आणि ज्योतिषाच्या नावाखाली महिलांची फसवणूक व शोषण कसे केले जाते, याचे गंभीर चित्र समोर आले आहे. पोलिसांनी पीडित महिलांना पुढे येण्याचे आवाहन केले असून, त्यांची ओळख गोपनीय ठेवली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







