अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या कारवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत असून त्याआधीच ही घटना घडली आहे, त्यामुळे अहमदनगरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
अकोले तालुक्यातील चीतळवेढे गावाजवळ सोमवारी (ता. ६) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या दगडफेकीत वाहनाचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र, सुदैवाने या घटनेत उत्कर्षा रूपवते यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते या आपला प्रचार दौरा आटोपून सोमवारी रात्री कारने संगमनेरकडे जात होत्या. यावेळी अकोले तालुक्यातील चीतळवेढे गावाजवळ त्यांची कार आली असता, अज्ञात व्यक्तींनी कारवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. कारचालकाने सतर्कता दाखवत कार थांबवली नाही. त्यामुळे या हल्ल्यातून उत्कर्षा रूपवते थोडक्यात बचावल्या.
यानंतर अंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोर पसार झाले. दरम्यान, याप्रकरणी उत्कर्षा रूपवते यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू केला आहे.