सोलापूर : माढा लोकसभेत जोरदार चुरस पाहायला मिळत असून धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर हे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच उत्तम जानकर आणि मोहिते पाटील कुटुंबिय एकत्र येणार आहेत, त्यामुळे जानकर हे शरद पवार गटाची तुतारी हाती घेणार का हे पाहून महत्वाचं ठरणार आहे. वेळापूरमध्ये जानकरांच्या कार्यकर्ता मेळाव्याला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळेत जानकर आपली भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे माढ्यात भाजपला आणखी एक धक्का बसणार असं बोललं जात आहे.
उत्तम जानकर यांनी महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांना जेवणाचे निमंत्रण दिलं आहे. जानकरांची मोहिते पाटलांसोबत डिनर डिप्लोमसी चर्चेचा विषय ठरली आहे. जानकरांच्या मेळाव्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जानकरांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
दरम्यान, उत्तम जानकर भाजपकडून सोलापूर लोकसभा लढवण्यास इच्छुक होते, मात्र, सोलापुरातून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना तिकीट दिल्याने जानकर नाराज झाले. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी विशेष विमान पाठवून तातडीने नागपूरला बोलावले होते. यावेळी झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी जानकर यांना विधान परिषद किंवा विधानसभा, आता रान मोकळे तुम्ही मागाल ते देऊ, असे आश्वासन दिल्याचे उत्तम जानकर यांनी सांगितलं होते.
देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आता उत्तम जानकर शरद पवार यांची भेट घेऊन त्यांची बाजू जाणून घेणार आहेत. आज १९ एप्रिलला ते आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे जानकर यांच्या निर्णयाने माढ्याची गणिते बदलणार आहेत.