नाशिक : नाशिकमधु एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकमधील भारतीय सैन्यातील दोन अग्नीवीरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तोफेचा गोळा लोड करत असताना ब्लास्ट झाला आणि त्यामध्ये अग्नीवीर गोहिल सिंग (वय 20) आणि सैफत शित (वय 21) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने देवळाली येथील सैनिकी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. आयएफजी फील्ड गणचा तुकडा शरीरात घुसल्याने त्यांचा मृत्यू झाला. नाशिकच्या देवळाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नेमकं काय घडले?
नाशिकमधील देवळाली कॅम्पमध्ये भारतीय लष्कारातील जवानांना प्रशिक्षण देण्यात येते. देशात अग्नीवीर योजना सुरु झाल्यापासून अग्नीवीर योजनेतील सैनिकांचे प्रशिक्षण नाशिकमधील देवळाली भागात होते. या प्रशिक्षणा दरम्यान दोन अग्नीवर जवानांना तोफेचा गोळा लोड करण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. त्यावेळी अचानक स्फोट झाला. या स्फोटामध्ये गोहिल सिंग आणि सैफत शित गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता पोलीस आणि लष्कराकडून या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे.
अग्नीवीर जवानांची तुकडी गुरुवारी दुपारी १२ वाजता नाशिकमधील शिंगवे बहुलाला फायरिंग रेंजमध्ये सरावासाठी गेली होती. यावेळी तोफेजवळ गोळ्याचा स्फोट झाला. त्यामुळे बॉम्बचे शेल उडून त्या अग्नीवीर जवानांच्या शरीरात गेले. या घटनेत दोघ जवानांचा मृत्यू झाला आहे. तसेच एक अग्निवीर जखमी झाला आहे. त्याच्यावर लष्कराच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.