नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज नाशिकमधल्या पंचवटीतील काळाराम मंदिरात श्रीरामाची महाआरती केली. ५ वाजता त्यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. यावेळी त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी भगवा कुर्ता परिधान केला होता. तसंच बाळासाहेबांप्रमाणे गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्या होत्या. कपाळावर भगवा टीळा लावला होता. त्यांना पाहिल्यानंतर अनेकांना बाळासाहेबांची आठवण आली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मंगळवारी म्हणजे 23 जानेवारीला जयंती आहे. यानिमित्ताने पक्षाचे महाशिबीर आयोजित करण्यात आले असून संध्याकाळी जाहीर सभा होणार आहे.
आगमी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दुपारी 12 वाजता नाशिक विमानतळावर दाखल झाले होते. ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचे जंगी स्वागत केले होते. त्यांच्या स्वागतासाठी 20 ते 25 फुटांचा हार जेसीबी सहाय्याने उद्धव ठाकरेंना घालण्यात आला. 1 वाजता उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले.