नाशिक: नाशिक येथील गोल्फ मैदानात झालेल्या ठाकरे गटाच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खरपूस टीका केली आहे. सध्या महाराष्ट्र ओरबडला जात असताना मिंधे दिल्लीसमोर शेपूट हलवत असल्याची टीका ठाकरे यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी हे गुजरात आणि भारतामध्ये भिंत उभी करत असल्याचे म्हटले.
शिवसेना- उद्धव ठाकरे गटाचे दोन दिवसाचे महाअधिवेशन नाशिकमध्ये पार पडले. या अधिवेशनाची सांगता मंगळवारी गोल्फ मैदानातील जाहीर सभेने झाली. यावेळी शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला.
माणसांना वापरा आणि फेका ही भाजपाची नीती आहे. त्यांना मित्र पक्षही नकोसे झाले आहेत असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून प्रचार करुन घेतला आणि विजयानंतर त्यांना मामा बनवलं. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचा वापर केला आणि फेकून दिलं. मिंध्यांचाही वापर करुन त्यांनाही फेकतील अशीही टीका त्यांनी केली. तसंच अमित शाह यांनी २०१९ मध्ये दिलेलं वचन पाळलं नाही. ते पाळलं असतं तर आज संपूर्ण शिवसेना तुमच्या पाठिशी असती आणि मोदींना महाराष्ट्राच्या वाऱ्या कराव्या लागल्या नसत्या असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
मी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत..
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज मी बाळासाहेबांचे विचार सोडले असं विरोधकांचे असेल तर २०१४ मध्ये शिवसेनेशी भाजपाने युती का तोडली होती? मे महिन्यापर्यंत आ गले लग जा असं होतं. त्यानंतर जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये नेमकं काय घडलं? आम्ही काय धर्मांतर केलं की तुम्ही शिवसेनेशी युती तोडली? भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये आपल्याशी युती तोडली आणि ६३ आमदार निवडून आणले. २०१४ मध्ये दिल्लीत अशी चर्चा होती की, आता बाळासाहेब ठाकरे राहिले नाहीत. त्यामुळे हा विचार चालला होता क, उद्धव एकटा काय करणार? आता वेळ आली आहे शिवसेना संपवा, असं मला एका व्यक्तीने सांगितलं होतं, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.