नाशिक : शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास आणि ४५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध बालकांचे लैंगिक शोषण व अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या निकालाची माहिती अभियोग कक्षाकडून देण्यात आली.
गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सप्टेंबर २०१९ ते डिसेंबर २०२० या कालावधीत हा गुन्हा घडला होता. या गुन्ह्यात वसंत गांगोडे (वय ३५, शिवाजीनगर, सातपूर) आणि हरिदास राऊत उर्फ सोनू (वय २०, देवडोंगरा, त्र्यंबकेश्वर) या आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले. अल्पवयीन मुलगी प्रसाधनगृहात जात असताना बळजबरीने पाठोपाठ शिरून वसंत गांगोडेने दरवाजाची कडी आतून बंद करीत अत्याचार केले. दुसरा आरोपी पीडितेच्या शाळेत शिक्षण घेत होता. त्याने पीडितेच्या घरात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे पीडिता गरोदर झाली. याबाबत कुठे वाच्यता केल्यास आरोपीने तिला जिवे मारण्याची धमकी दिली. १० दिवसांनी आरोपीने पुन्हा असाच प्रकार केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपींविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होती. न्यायालयाने तक्रारदार, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष, तपासणी अंमलदारांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुराव्याला अनुसरून विविध कलमांन्वये आरोपींना शिक्षा सुनावली. वसंत गांगोडेला बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तीन कलमांन्वये प्रत्येकी २० वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी १० हजार रुपये आणि अन्य एका कलमाद्वारे एक वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपयांची शिक्षा सुनावली. तर, हरिदास राऊतला २० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त अभियोक्ता म्हणून सुलभा सांगळे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक रिना आहेर, विजय पाटील आणि उपनिरीक्षक इकबाल पिरजादे यांनी या गुन्ह्यात शिक्षा लागण्याच्या दृष्टीने वेळोवेळी पाठपुरावा केला.