नाशिकः शहरातील वेगवेगळ्या भागात मंगळवारी (दि.३०) रणरणत्या उन्हात चक्कर येवून पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. त्यात विवाह सोहळ्यानिमित्त शहरात आलेल्या श्रीरामपूर येथील ३७ वर्षीय विवाहीतेचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी व आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. मालेगाव पाठोपाठ नाशिक शहरातही उष्णतेचा पारा ४० पार गेल्याने नाशिककरांना अंगाची लाहीलाही होत असल्याचा प्रत्यय येत आहे. अशास्थितीत सुनिता नितीन कारवाळ (वय ३७ रा. सम्राटनगर, श्रीरामपूर) या नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यानिमित्त कुटुंबियांसह मंगळवारी शहरात आल्या होत्या. छत्रपती संभाजी मार्गावरील नांदूरनाका भागातील विवाहसोहळा आटोपून दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कारवाळ दांम्पत्य परतीच्या प्रवासासाठी निघाले असताना ही घटना घडली. लॉन्सच्या प्रवेशद्वारावर अचानक चक्कर येवून सुनिता कारवाळ कोसळल्या. पती नितीन कारवाळ यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, अल्पावधीतच उपचार सुरू असताना वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुसरी घटना दिंडोरीरोडवरील मार्केट यार्ड भागात घडली. हिरावाडीतील अनिलकुमार मनोहरराव ठक्कर (वय ५५ रा. सिध्देश्वरनगर) हे मंगळवारी सकाळी कामानिमित्त दिंडोरीरोडवरील मार्केट यार्ड भागात गेले होते. दहा वाजेच्या सुमारास मार्केट यार्डाच्या प्रवेशद्वाराजवळून ते पायी जात असताना अचानक चक्कर येवून ते जमिनीवर कोसळले. मुलगा अनिकेत ठक्कर यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकिय सुत्रांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.