नाशिक : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या ४३ वर्षीय महिलेस एकाने आपल्या साथीदाराच्या मदतीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी एकाने पकडून ठेवत दुसऱ्याने पिडीत महिलेवर धारदार शस्त्राने वार केले. एवढ्यावरच न थांबता निर्दयी मित्र व त्याच्या साथीदाराने सदर महिलेचे तोंड पाण्याच्या टबमध्ये बुडवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार द्वारका परिसरातील काठे गल्ली भागात घडला. पोलीसांनी महिलेच्या मित्राच्या मुसक्या आवळल्या असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोपान सावळीराम नाडे (रा. नागसेननगर, वडाळानाका) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याचा साथीदार अद्याप फरार आहे. ४३ वर्षीय पिडीतेने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पिडीता व संशयित काठे गल्लीतील नारायणी अपार्टमेंटमधील एका सदनिकेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये वास्तव्यास आहेत. सोमवारी (दि.६) दुपारच्या सुमारास किरकोळ कारणातून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने संशयिताने आपल्या साथीदारास घरी बोलावून हे कृत्य केले. ‘मला तुझ्यासोबत राहायचे नाही, तू माझ्या घरातून निघून जा’ असे म्हणत संशयिताने घरी आलेल्या साथीदाराला सदर महिलेस पकडून ठेवण्यास सांगितले.
यावेळी संशयिताने तिच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. महिलेच्या गळ्यावर, तोंडावर, कानावर आणि पोटावर वार करण्यात आल्याने ती रक्तबंबाळ झाली. त्यानंतर संशयितांनी तिला बाथरूममध्ये ओढत नेवून पाण्याच्या टबमध्ये तिचे तोंड बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कशीबशी सुटका करून घेत महिलेने रूग्णालय गाठल्याने ती थोडक्यात बचावली. तिच्यावर उपचार सुरू असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी तात्काळ तिच्या मित्रास बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक सविता गवांदे करीत आहेत.