सिन्नरः कासव असल्याचे सांगत तीन बालकांना विहिरीत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे घडला आहे. सुदैवाने या तीनही बालकांचे प्राण वाचल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला असून, हत्येचा प्रयत्न करणाऱ्या तिघा संशयितांविरोधात सिन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका संशयिताच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकरणाचे गूढ शुक्रवारी उलगडले. वडगाव पिंगळा येथे नाशिक कारखाना रस्त्यावर अमोल रामनाथ लांडगे आणि संतोष घुगे वास्तव्यास आहेत.
याच परिसरात नाना भाऊ सानप यांची विहीर आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास या विहिरीजवळ विक्रम नारायण माळी आणि साईनाथ शिवाजी ठमके थांबलेले होते, तर वरद संतोष घुगे (१३), अथर्व संतोष घुगे (९) आणि त्यांचा मित्र आदित्य सानप (१३) हे तिघे अंगणात खेळत होते. या वेळी आपण कासव आणू या, असे सांगत अमोल लांडगे याने वरद, अथर्वला घेऊन विहीर गाठली. त्यांच्या पाठोपाठ आदित्यही तेथे आला. विक्रम माळी व साईनाथ ठमके यांनी या विहिरीत कासव असल्याचे सांगितले. ते पाहण्यासाठी वरद, अथर्व आणि आदित्य विहिरीत वाकून बघत असतानाच विक्रम व साईनाथ यांनी तिघांनाही विहिरीत ढकलत पळ काढला.
दुसऱ्या दिवशी फुटले बिंग
वरद व अथर्वचे आई-वडील संतोष घुगे व दीपाली घुगे यांचे शिंद येथे महा ई-सेवा केंद्र असल्याने रात्री उशिरा ते घरी परतले. तोपर्यंत दोन्ही मुले झोपी गेली होती. शेजारी राहणाऱ्या आदित्यने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. आदित्यच्या आईने घुगे यांच्या घरी येत त्यांना घटनेची माहिती दिल्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले. गुरुवारी सकाळी घुगे आणि सानप कुटुंबाने एकत्र येऊन पोलीस पाटील सागर मुठाळ यांच्याशी संपर्क साधला. या प्रकरणी दीपाली संतोष घुगे यांनी सिन्नर पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यावरून कट रचून मुलांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अमोल रामनाथ लांडगे याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यास अटक करण्यात आली आहे. दोनही फरार संशयितांचा शोध सुरू आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रूपाली चव्हाण करीत आहेत.
वरदचे प्रसंगावधान अन् सुदैवाने वाचलेले प्राण
संशयितानी विहिरीत ढकलून दिल्यानंतर खाली कोसळत असतानाच वरदचा हात विहिरीत विद्युतपंप, पाइप, केबल यांना बांधलेल्या दोरखंडाच्या जाळ्यात अडकला. प्रसंगावधान राखत वरदने दोरखंडाला धरून स्वतःचा जीव वाचवत अर्थव आणि आदित्य यास विहिरीबाहेर काढले. बाहेर आल्यानंतर वरदने अमोलला फोन करून तुम्ही आम्हाला कासव आणायला पाठवले, त्या माणसांनी आम्हाला विहिरीत ढकलून दिले, असे सांगितले. त्यावर अमोल लांडगे याने झाला प्रकार कुणाला सांगू नका, असे धमकावले. त्यानंतर मुले कपडे बदलून झोपी गेली.