अहिल्यानगर : कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक येथील उम्रावती नदीवर गाडी धुवत असताना पाय घसरुन नदीत पडल्याने दोन शेतकऱ्यांचा बुडून मृत्यू झाल्यची घटना घडली आहे. एकीकडे दिवाळीची धामधूम आणि दुसरीकडे दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना शनिवारी (दि. ०२) दुपारच्या सुमारास घडली आहे. उत्तम राहणे (वय-४२), माधव गमे (वय-३२) असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव तालुक्यातील मढी येथील उम्रावती नदीवर आपले चारचाकी वाहन धुण्यासाठी गेले असता उत्तम राहणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राहणे हे आपले वाहन धुत असताना पाय घसरून नदीत पडले. त्याच वेळी माधव गमे हे देखील त्यांना वाचवण्यासाठी गेले. दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले.
या घटनेची माहिती मिळताच कोपरगाव नगर परिषदेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत दोघांचा शोध घेतला. काही वेळातच कोपरगाव नगर परिषदेच्या पथकाला मृतदेह बाहेर काढण्यास यश आले. ऐन दिवाळीच्या दिवशी राहणे आणि गमे कुटुंबीयांवर दु: खाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.