नाशिक : विवाह सोहळ्यानिमित्त भुसावळ येथे जाणारी मालवाहू पिकअप पुढे जाणाऱ्या ट्रकवर आदळल्याने झालेल्या अपघातात वरमाईसह चालक ठार झाला. या अपघातात अन्य पाच वऱ्हाडी जखमी झाले असून, त्यात लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ममतादेवी प्रेमकुमार मोदनवाल (५४, रा. नालासोपारा, मुंबई) व रामदास संतोष सोनवणे अशी मृतांची नावे आहेत. तर, श्रेया प्रेमकुमार मोदनवाल, अभिनंदन अशोक मोदनवाल, अंश अशोक मोदनवाल पिंकीदेवी अशोक मोदनवाल व वरुण अशोक मोदनवाल अशी अपघातात जखमी झालेल्या वऱ्हाडींची नावे आहेत. मोदनवाल कुटुंबीय मुंबईत वास्तव्यास आहेत.
ममतादेवी मोदनवाल यांचा मुलगा विष्णू प्रेमकुमार मोदनवाल याने मूळच्या भुसावळ येथील वधूशी दोन दिवसांपूर्वीच प्रेमविवाह केला होता. यानंतर वधुपित्याकडून आयोजित छोटेखानी कार्यक्रमासाठी मोदनवाल कुटुंबीय रविवारी भुसावळच्या दिशेने पिकअपने रवाना झाले. भुसावळच्या दिशेने जाताना पहाटे महामार्गावर स्पीडब्रेकरमुळे पुढे जाणाऱ्या मालट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने पिकअप ट्रकवर आदळली.