मालेगाव(Shirdi Crime News): साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या दोन भक्तांचे मालेगाव परिसरातून अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी केवळ काही तासांतच या अपहरणाचा तपास उलगडत दोन्ही भाविकांची सुटका केली असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. समाधान देवरे, शिवम पैठणकर, रोशन अहिरे, गणेश मेंढावत आणि सोमनाथ आहेर या पाच अपहरणकर्त्या आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेल्या भाविकांची नावे टिपी प्रसाद राजू आणि जलंदर पोडाल अशी आहेत. ते दोघेही ओडिशा राज्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. हे भाविक साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीकडे जात होते. त्यावेळी मालेगाव परिसरात त्यांचे अज्ञातांनी अपहरण केले. त्यानंतर त्यांना मालेगावजवळील कौळाने भागातील एका हॉटेलमध्ये कैद करून ठेवण्यात आले होते.

दरम्यान, सदर घटनेची माहिती मालेगाव पोलिसांना मिळाली असता त्यांनी तत्परता दाखवत कौळाने येथील हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी तेथे ठेवलेल्या दोन्ही भाविकांची सुखरूप सुटका करण्यात आली.

सदर प्रकरणी पोलिसांनी समाधान देवरे, शिवम पैठणकर, रोशन अहिरे, गणेश मेंढावत आणि सोमनाथ आहेर या पाच संशयितांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याविरुद्ध अपहरण आणि बेकायदेशीररीत्या कैद करून ठेवल्याचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
आरोपींनी या दोघांचे अपहरण नेमक्या कोणत्या हेतूने केले होते? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.







