अहमदनगर : सर्वत्र रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा होत असताना अहमदनगरमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे एका व्यक्तीने आपली पत्नी आणि दोन मुलींना जिंवत जाळल्याची घटना घडली आहे. ही घटना २५ मार्च रोजी घडली. सुनील गोरख लांडगे असं आरोपीच नाव आहे. या घटनेने परिसारत एकच खळबळ उडाली आहे. लीलाबाई सुनील लांडगे असं मृत आईचं नाव आहे. तर साक्षी आणि खुशी अशी दोन्ही मृत मुलींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. नैतिक संबंधाच्या संशयातून ही घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी सुनील लांडगे याला आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यातून त्यांचे नेहमीच वाद होत असत. आज सकाळी आरोपी व पत्नीत पुन्हा वाद झाला. याच वादातून त्याने पत्नीसह मुलींच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. या घटनेत तिघींचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नगर पोलिसांनी आरोपी सुनील गोरख लांडगे याला ताब्यात घेतलं असून पोलीस अधिक तपास करत आहेत. हत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेने तालुक्यात शोककळा पसरली आहे.