सिन्नर: तालुक्यातील कुंदेवाडी येथील देवनदीच्या संगमावरील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सार्थक काळू जाधव (१६) व अमित संजय जाधव (१६, रा. आंबेडकर नगर, सिन्नर) अशी बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
सिन्नर परिसरात झालेल्या पावसामुळे कुंदेवाडी देवनदी संगमातील बंधाऱ्यात पाणी साचले आहे. त्यामुळे सिन्नर् परिसरात उकाड्याने त्रस्त अनेक तरुण याठिकाणी पोहण्यासाठी येत असतात. सिन्नर येथील आंबेडकर नगरमधील चार युवकही येथे पोहण्यासाठी गेले होते. परंतु, या बंधाऱ्यातील मोठ्या खड्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने सार्थक जाधव व अमित जाधव बुडाले. या घटनेमुळे घाबरलेल्या दोन साथीदारांनी जवळच्या काही रहिवाशी महिलांना त्यांचे मित्र पाण्यात बुडाल्याचे सांगितले. ही बाब समजताच कुंदेवाडी येथील वस्तीवरील युवकांनी तत्काळ पाण्यात उतरत एका युवकाला बाहेर काढले.
तसेच अविंडकर नगर येथील प्रवीण जाधव व इतर साथीदारांनी दुसऱ्या युवकालाही पाण्याच्या बाहेर काढले, घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही युवकांना तत्काळ सिन्नर नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सिन्नर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत तांबडे तपास करीत आहेत. सार्थकच्या वडिलांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले असून त्यांच्यानंतर मुलावरही काळाने झडप घातल्याने जाधव कुटुंबीयांनी आक्रोश केला.
चिखलात फसल्याचा अंदाज
बंधाऱ्यातील खड्ड्यात पावसाच्या पाण्याबरोबर इतर घाण व कचराही साचलेला असल्यामुळे पोहण्यासाठी गेलेले सार्थक व अमित चिखलात फसून बुडाले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सार्थक नवजीवन शाळेत व अमित जाधव महात्मा फुले विद्यालयात शिकत होता. दोघांनीही यावर्षीच दहावीची परीक्षा दिली आहे. परीक्षेचा निकाल येण्यापूर्वीच दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.