मालेगाव: वडिलांच्या अंत्यविधीसाठी जात असताना झालेल्या भीषण अपघातात दोन बहिणींसह जावई ठार झाल्याची घटना वाके (ता. मालेगाव) शिवारात गुरुवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास घडली. मुंबई-आग्रा महामार्गावरील कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटनेरला धडक दिल्याने हा अपघात झाला. मीनाक्षी अरुण हिरे (५०, रा. टिटवाळा, जि. ठाणे), सुनंदा विकास सावंत (४०) व विकास चिंतामण सावंत (४५, दोघेही रा. ठाकुर्ली, जि. ठाणे) असे मृत्यू झालेल्यांची नावे असून, वैभवी प्रवीण जाधव (१७, रा. नाशिक) ही युवती गंभीर जखमी झाली आहे. वडिलांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी सर्वजण ठाणे येथून मालेगावकडे जात होते. मात्र, वडिलांच्या अंत्यविधीपूर्वीच हा अपघात झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
गुरुवारी पहाटे सव्वा चारच्या सुमारास हा अपघात झाला. मीनाक्षी आणि सुनंदा यांच्या वडिलांचे मालेगावी निधन झाल्यानंतर या दोन्ही बहिणी मालेगावी येत होत्या. विकास सावंत हे शिक्षक असून, कार स्वतः चालवून आणत असताना वाके शिवारात एका हॉटेलसमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर कार पाठीमागून जोरदार धडकली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. या अपघातात सुनंदा आणि विकास सावंत हे दाम्पत्य तसेच मीनाक्षी हिरे यांचा मृत्यू झाला. जखमींना तत्काळ मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी अरुण बाबूराव हिरे यांनी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंजी तपास करत आहेत.