धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात तीन एकरावरील गांजाची शेती पोलिसांनी उध्वस्त केली आहे. या कारवाईत कोट्यावधीचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. शेतात पिकांमध्ये गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने साधारण दोन ते तीन एकर क्षेत्रात लागवड केलेल्या गांजाच्या शेतीवर कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची शेती केली जात असल्याची माहिती धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक धिवरे यांनी तात्काळ पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकासह टाकलेल्या छाप्यात जवळपास दोन ते तीन एकर क्षेत्रात पाच ते सात फूट उंचीपर्यंत गांजाची लागवड केली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात सुका गांजा देखील बांधावरती पोलिसांना आढळून आला. या कारवाईत गांजाची ओली झाडे तसेच बांधावर सुकायला ठेवलेली झाडे असा जवळपास कोट्यावधी रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच गांजा लागवड करणाऱ्या संबंधितांचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे करण्यात येत आहे.