नाशिक : राज्यात गेले काही दिवस झाले जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे बहुतांश भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाने हैदोस घातला आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली असून नाशिकच्या सात धरणांमधून सध्या विसर्ग सुरु असल्याने नद्यांना पूर आल्याचे चित्र आहे. त्यातच रविवारी गिरणा नदीच्या पाण्यात मासे पकडायला गेलेल्या 12 जणांसोब एक घटना घडली असून ते पुराच्या पाण्यात अडकले आहेत. नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने या 12 जणांना तब्बल 15तासांहून अधिक कालावधी उलटूनही अद्याप नदीपात्रातून बाहेर काढता आलेले नाही. या 12 जणांना आता हेलिकॉप्टरद्वारे बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील गिरणा नदीच्या पुरात अडकलेल्या 12 जणांना वाचविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत. हे सर्वजण अद्यापही पुराच्या पाण्यातच अडकलेले असून त्यांनी संपूर्ण रात्र खडकावर बसून काढली आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने गिरणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. यामुळे पुरात अडकलेल्या 12 जणांना वाचवण्यासाठी खूप अडचणी निर्माण होत आहे.
हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन..
15 तासांहून अधिक कालावधी उलटूनही 12 जणांना अद्याप नदीपात्रातून त्यांची सुटका करता आली नाही. मनपा प्रशासन, अग्निशमन दल, एसडीआरएफ जवानांचे या 12 जणांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाह जास्त असल्याने तरुणांना बाहेर काढण्यास अडथळे निर्माण होत आहे. नाशिकच्या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे , आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अडकलेल्या तरुणांना जेवण पोहचवण्यात आले आहे. दरम्यान, अशा आपत्कालीन परिस्थितीत आता हेलिकॉप्टरची मदत घेवून 12 जणांना बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती मालेगाव महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यांनी दिली आहे.
उंच खडकाचा आधार..
दरम्यान, या तरुणांना वाचविण्यासाठी धुळे येथून एसडीआरएफची टीम रात्री घटनास्थळी दाखल झाली. मात्र रात्री अंधारामुळे बचावकार्य थांबविण्यात आले होते. सकाळी अग्निशमन दल आणि नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र पुराच्या पाण्यात वाढ झाली असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत. पाण्यात अडकलेले सर्वजण एका उंच खडकावर असल्यामुळे सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.