अहमदनगर : सुजय विखे यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅड पडताळणीची मागणी केली आहे. तसेच निलेश लंके यांनी प्रचारादरम्यान आपली बदनामी केल्याचा आरोप देखील केला आहे. याबाबत अहमदनगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी भाजप नेते सुजय विखे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. निलेश लंके यांनी आज अहमदनगर महापालिकेमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
निलेश लंके म्हणाले, देशात एवढे खासदार निवडून आले, मात्र त्यांच्याबाबत कोणी आक्षेप घेतला नाही. विखे कुटुंबांची हीच खासियत आहे, त्यांना पराभव मान्यच नाही. यांच्या आजोबांनी हेच केलं आणि हे देखील तेच करत आहेत, असा हल्लाबोल लंके यांनी विखे यांच्यावर केला आहे.
निलेश लंके म्हणाले, मी लोकसभेचा खासदार म्हणून पाच वर्षासाठी निवडून आलो आहे. त्यामुळे या मतदारसंघात विकासाची गंगा
प्रत्येकाच्या घराघरापर्यंत कशी पोहोचवता येईल हा भाग माझ्याकडे आहे. त्यांच्याकडे कोणतेही काम नाही म्हणून कोर्टचे काम त्यांच्याकडे देऊन टाकायचे आहे, असं म्हणत निलेश लंके यांनी नाव न घेता सुजय विखे यांच्यावर टीका केली आहे.
तर आपली महानगरपालिका का नाही?
राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी आज अहमदनगर महापालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. येत्या काळात अहमदनगर शहरात विविध नागरी समस्या कशा सोडवाव्यात. यासाठी आम्ही प्रयत्न करू. जर इंदुर सारखी महानगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीत देशात एक नंबर येऊ शकते, तर आपली महानगरपालिका का नाही येणार ? असा सवालही निलेश लंके यांनी केला आहे. त्याशिवाय त्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना दोष न देता सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहोत. असंही लंके यावेळी म्हणाले.