ढोरजळगाव, (अहमदनगर) : शेवगाव आगाराच्या मिरीमार्गे नगरहून शेवगावकडे येणाऱ्या धावत्या एस.टी बसच्या मागील बाजूची दोन चाके निखळल्याची घटना घडली आहे. या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. रस्त्यावरील नागरिकांसह प्रवाशांच्या ही बाब तत्काळ लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड करून चालकाला बस थांबविण्यास लावली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
नेमकं काय घडलं?
शेवगाव आगाराची मिरीमार्गे नगरहून शेवगाव कडे येणारी बस शनिवारी (दि. २४) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास निंबेनांदूरला पोहोचली. तेथील प्रवासी उतरल्यानंतर बस भरधाव ढोरजळगावच्या दिशेने निघाली होती. बसच्या मागील बाजूची दोन्ही चाके निखळून बाहेर आली. ही बाब रस्त्यावरील वाहनचालक व इतरांच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरड करून चालकाला बस थांबविण्यास सांगितली.
त्याने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या एका बाजूला उभी केली. त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेमुळे एक मोठा अपघात टळला असला तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर झाला आहे. यावेळी दुसऱ्या बसची व्यवस्था होईपर्यंत प्रवाशांना पावसात भिजत उभे राहावे लागले.