नेवासा, (अहमदनगर) : धनगर आरक्षणप्रश्री गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण आंदोलन करत असलेले आणि ‘जलसमाधी घेत असल्याची’ चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेल्या दोन आंदोलनकर्त्यांचा अखेर शोध लागला आहे. ते दोन्ही आंदोलक सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
शुक्रवारी (दि. २७) सकाळी एका मच्छीमाराने याबाबत माहिती दिली आहे. ते दोघे प्रवरासंगम येथेच पुलाखालील परिसरात एका तराफ्यावर रात्र काढल्याचे मच्छिमाराला आढळून आले आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
‘आम्ही जलसमाधी घेत आहोत, अखेरचा जय मल्हार’ असे चिठ्ठीत लिहून प्रल्हाद सोरमारे व बाळासाहेब कोळसे हे दोन आंदोलक गुरुवारी (दि. २६) सकाळी बेपत्ता झाले होते. छत्रपती संभाजीनगर मार्गावरील प्रवरासंगम येथे गोदावरी पुलावर उभ्या असलेल्या कारवर त्यांनी ही चिठ्ठी ठेवली होती. तसेच बाजूला आपला मोबाईल आणि चपलाही ठेवल्या होत्या. त्यांनी जलसमाधी घेतल्याची शक्यता व्यक्त करून एनडीआरएफचे पथक आणि प्रशासनाने शोधकार्यही हाती घेतले होते. रात्री उशिरा अंधारामुळे शोध थांबवण्यात आला होता.
अखेर शुक्रवारी (दि. २७) सकाळी मच्छिमारांना ते दोघे नदीपात्रात मच्छीमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या छोट्या तराफ्यावर (चप्पू) ते दोघे झोपलेले आढळले. मच्छिमारांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर एनडीएआरएफच्या पथक त्या ठिकाणी दाखल झाले असता हे दोघेही नदीपात्रात मच्छीमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या छोट्या तराफ्यावर झोपलेले आढळले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, रामराव कोल्हे (रा. कारला, ता. जि. जालना) हा आणखी एक आंदोलक शुक्रवारी सकाळी बेपत्ता झाला होता. तोदेखील पुलावर फिरताना आढळला. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले.