नाशिक : नाशिकमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अनंत चतुर्दशीला गणरायाचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन महाविद्यालयीन मित्रांचा वालदेवी नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पाथर्डी शिवारात मंगळवारी (दि.१७) सायंकाळच्या सुमारास घडली आहे. ओमकार चंदक्रांत गाडे (वय-१७), स्वयंम भय्या मोरे (वय-१८, दोघे रा. साई अव्हेन्यू, ज्ञानेश्वरनगर) अशी दोघांची नावे आहेत. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरात मंगळवारी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. सर्वत्र लहान-मोठ्या विसर्जन मिरवणूकांचे वातावरण बघायला मिळत होते. ओंकार व स्वयंम हे दोघेही गणरायाचे विसर्जन करण्यासाठी पाथर्डी शिवारातून वाहणाऱ्या वालदेवी नदीकाठी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गेले होते. गणरायाच्या मुर्तीचे पाण्यात विसर्जन करताना या दोघांना नदीपात्राच्या खोलीचा व पाण्याच्या प्रवाहचा अंदाज आला नाही.
त्यामुळे दोघेही प्रवाहात वाहून जात गटांगळ्या खाऊ लागले. आजुबाजुला असलेल्या लोकांच्या लक्षात हा प्रकार आला, असता त्यांनी आरडाओरड केली. या घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन उपकेंद्रप्रमुख लिडींग फायरमन प्रमोद लहामगे, मोहियोद्दीन शेख, मुकुंद सोनवणे, प्रशिक्षणार्थी किरण हनवते, इंद्रजीत पाटील, केशव सानप व बंबचालक गणेश गायधनी यांनी घटनास्थळाच्यादिशेने धाव घेतली. दरम्यान, एक तासाच्या शोधानंतर दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर इंदिरानगर पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला.
मयत ओमकार हा केटीएचएम महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता. तर स्वयंम मोरे संदीप फाऊंडेशनमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. या दोन्ही तरुण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे म्हाडा कॉलनी व पाथर्डी परिसरात शोककळा पसरली आहे.