संगमनेर : संगमनेर तालुक्यातील झोळे गावात पडवीत झोपलेल्या एका ७० वर्षीय वृद्धाचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि. ०५) सकाळी उघडकीस आली आहे. साहेबराव भिमाजी उनवणे (वय-७०, रा. झोळे, ता संगमनेर, जिल्हा अ.नगर) असे खून झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत साहेबराव उनवणे हे संगमनेर तालुक्यातील झोळे गावात राहत होते. ते नेहमीप्रमाणे आपल्या घराच्या पडवीमध्ये रविवारी रात्री जेवण करून झोपले होते. अचानक मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांचा खून केला.
दरम्यान, सकाळी सुनबाई ही उठून घराबाहेर आली असता तिला आपले सासरे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. यानंतर सुंबाईनी घाबरून मोठ्याने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकल्यानंतर मयत उनवणे यांचा मुलगाह धावत आला. त्यानंतर या घटनेची माहिती संगमनेर तालुका पोलिसांना देण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढमणे, आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच संगमनेर उपविभागाचे पोलीस उपधीक्षक सोमनाथ वाघचौरे हे देखील घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता खुनासाठी वापरण्यात आलेली कोणत्याही वस्तू आढळून आली नाही. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.