कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी मंजूर येथील गोदावरी नदीपात्रातल्या मोटार काढण्यासाठी गेलेले तीन तरुण नदीत वाहून गेले. मात्र, जवळच असलेल्या पवार दाम्पत्याने हे पाहिलं आणि ताईबाई पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या अंगावरील साडी काढून वाहून जाणाऱ्या दोन्ही मुलांकडे फेकली. त्यातील दोन मुले बाहेर काढली. मात्र या घटनेत एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ताईबाई पवार व तिच्या पतीने दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कि, सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दारणा धरणातून पाण्याची आवक होत असल्याने गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं आहे. पाणी सोडल्याचे कळताच तालुक्यातील हंडेवाडी-मंजूर येथील गोदावरी नदीवरील कोल्हापूर टाईपचा मंजूर बंधारा येथून शेतकरी संतोष भिमाशंकर तांगतोडे (वय-25), अमोल भिमाशंकर तांगतोडे (वय-30), प्रदिप भिमाशंकर तांगतोडे (वय-28) व नारायण भिकाजी तांगतोडे (वय-52) हे नदी किनारी मोटारी काढण्यासाठी गेले होते.
पाण्याचा अंदाज न आल्याने संतोष वाहत चालल्याचे नदी किनारी शेळी चारण्यासाठी आलेल्या ताईबाई छबुराव पवार आणि छबुराव बाबूराव पवार या शेतकऱ्यांना दिसले. यावेळी त्यांनी या तरुणांना वाचवण्यासाठी सुरुवात केली. क्षणाचाही विलंब न करता ताईबाई पवार यांनी स्वतःची नेसलेली साडी सोडून तरुणाच्या दिशेने फेकली त्या साडीला धरून दोन्ही तरुण नदी किनारी आले. त्यामुळे अमोल व प्रदीप या दोघांचा जीव वाचला. मात्र, संतोष प्रवाहात वाहून गेल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, दोन तरुणावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून तब्येत बरी असल्याचे बोलले जात आहे. संतोष तांगतोडे या युवकाचा शोध प्रशासनाकडून घेतला जात होता. त्यानंतर प्रशासनाच्या सहकार्याने पोहणाऱ्या तरुणांनी काल (दि. २६) सायंकाळी उशिरापर्यंत शोधकार्य सुरू केले. मात्र, सायंकाळपर्यंत शोध लागू शकला नसल्याने दुसऱ्या दिवशी देखील बोटीच्याद्वारे शोधमोहीम सुरु असताना मृतदेह नदीपात्रात आढळला.