नाशिक : दोन कोटींचे कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील भामट्याने एका शेतकऱ्यास अडीच लाखांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुधीर चव्हाण (रा. ब्रीज असो. मुलूंड, मुंबई) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत गणेश भाऊसाहेब माळोदे (रा.आडगाव, जि.नाशिक) यांनी फिर्याद दिली. माळोदे यांची फेब्रुवारी 2020 मध्ये तपोवन कॉर्नर भागातील कृष्णनगर येथे मित्र कुंदन चौधरी याच्या समवेत संशयिताशी भेट झाली होती. मुलूंड येथील ब्रीज असोशिएशन या वित्तीय संस्थेचा अधिकारी असल्याची बतावणी करत संशयिताने आमची संस्था अल्पदरात कृषी पर्यटनासाठी कर्ज उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले.
यावेळी माळोदे यांनी अॅग्रो टुरिझमसाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितल्याने संशयिताने सातबारासह अन्य कागदपत्रांची पाहणी करून दोन कोटी रूपयांचे कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवले. त्याने शेतजमिनीचा प्रोजेक्ट रिपोर्ट, ऑडिट रिपोर्ट व प्रॉपर्टी मॉर्गेज डीडीसाठी तीन लाख 65 हजार रूपये लागतील, असे सांगितल्याने माळोदे यांनी धनादेशाद्वारे रक्कम सुपूर्द केली.
दरम्यान, चार वर्षे उलटूनही कर्जाची रक्कम माळोदे यांना मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी तगादा लावला असता संशयिताने एक लाख रूपयांची रक्कम फोन पे द्वारे ऑनलाईन पाठवली. मात्र, त्यानंतर संपर्क तोडल्याने माळोदे यांनी पोलिसांत धाव घेतली.