धुळे : राज्यात गेले काही दिवस झाले पावसाचा जोर वाढत आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. अशातच धुळे शहरातील पांजरा नदी पात्रामध्ये वार कुंडाणे शिवारात एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे. काल संध्याकाळच्या सुमारास या तरुणाने धुळे शहरातील मोठ्या पुलावरून उडी घेतल्याचे परिसरातील काही नागरिकांना दिसून आले होते. तरुणाच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.
जोरदार पावसामुळे धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने धुळे शहर परिसरातून गेलेल्या पांझरा नदीला पूर आलेला आहे. नदीला पूर आला असताना शहरातील मोठ्या पुलावरून एका तरुणाने उडी घेतली होती असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती प्रशासनास देण्यात आल्यानंतर प्रशासनातर्फे त्याचा शोध देखील घेण्यात आला होता. परंतु अंधार पडल्यानंतर रात्री शोध कार्यास अडचणी येत होत्या त्यामुळे शोध कार्य थांबवण्यात आले होते.
दरम्यान, आज सकाळी पुन्हा एकदा या तरुणाला शोधण्यासाठी पथक नदीपात्रात गेले असता त्यांना धुळे शहरापासून काही अंतरावर असलेल्या वारकुंडाने शिवारात या तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असलेला आढळून आला आहे. या मृत तरुणाची अद्यापही ओळख पटलेली नाही. पुढील तपास पोलीस प्रशासनातर्फे करण्याचे काम सुरू आहे.