नाशिक : विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. अशातच माजी मंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बबन घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केलं आहे. तुनजा घोलप यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने त्यांना कौटुंबिक कलहाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीचे अर्ज माघारी घेताना तनुजा घोलप भावूक झाले.
महायुतीत नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आमदार सरोज अहिरे यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाने माजी आमदार योगेश घोलप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, येथून त्यांच्या बहिणीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अखेर भाऊबीजेच्या दुसऱ्यादिवशी तनुजा घोलप यांनी अर्ज माघारी घेतला आहे.
देवळाली मतदारसंघातून तनुजा घोलप यांचे भाऊ योगेश घोलप हे सुद्धा महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यामुळेच, कौटुंबिक वाद त्यांच्या उमेदवारीने उफाळून आला होता. त्यांचे वडिल बबन घोलप यांनी थेट कायदेशीर नोटीसच मुलगी तनुजा घोलपला पाठवली होती. तुमचं लग्न झालेलं असल्याने तुम्ही माहेरचे नाव न वापरता तुम्ही सासरकडील नाव वापरावे, अशा आशयाची जाहीर नोटीस माजी मंत्री बबन घोलप यांनी त्यांच्या मुलीला तनुजा घोलपला बजावली होती.
यावेळी बोलताना तनुजा घोलप म्हणाल्या, माझ्या भावाला निवडणुकीसाठी बहीण म्हणून मी शुभेच्छा देते. तसेच महायुतीतच राहून महायुतीचे काम करणार अशी भूमिका तनुजा घोलप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर व्यक्त केली आहे. याबरोबरच वडिल माजी मंत्री बबन घोलप यांनी पाठवलेल्या नोटीससंदर्भातही त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी म्हणाल्या की, माझ्या जन्मदाखल्यावर आजही तनुजा बबनराव घोलप नाव असल्याने तेच वापरणार असल्याचे म्हणाले. मात्र, वडिलांनी केलेल्या टीकेला कुठलेही उत्तर देणार नाही, पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आश्वासनानंतरच आपण माघार घेत असल्याचे तनुजा घोलप यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान, देवळाली मतदार संघात व शिवसेनेत देखील माजी मंत्री बबनरा घोलप यांच्या नावाचा दबदबा आहे.