पाथर्डी : विवाहित महिलेला ताई म्हणून ‘तुला गाडीवर तुझ्या घरी सोडतो’ असे सांगून महिलेचा विनयभंग केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील करडवाडी शिवारात घडली आहे. याप्रकरणी 30 वर्षीय विवाहितेने पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
करडवाडी येथील रहिवासी असलेल्या काळू या व्यक्तीने संबंधित महिलेचा विनयभंग केला. ही महिला करडवाडी येथून गवारीच्या शेंगा विकून घरी घाटशिरसकडे जात होती. याचवेळी काळू हा दुचाकीवरून घाटशिरसला जात होता. त्यावेळी तो त्या महिलेला ताई तुला यायचे का घरी असे म्हणाला. त्यानंतर महिला त्याच्या दुचाकीवर बसली.
काळू याने महिलेला पालवे (रा. घाटशिरस) शेताजवळ पांचाळा करडवाडी शिवारात नेले. त्या महिलेचा हात धरुन मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. त्यानंतर पीडित महिलेने आरडाओरडा केल्यानंतर काळू तेथून निघून गेला. महिलेच्या फिर्यादीवरून काळूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाथर्डी पोलिस करत आहेत.