अहमदनगर : निलेश लंके यांनी माझ्या एवढे इंग्रजीत बोलून दाखवावे, भलेही महिनाभर वेळ घेऊन पाठ करून बोलून दाखवावे, मी उमेदवारी अर्ज भरणार नाही असं आव्हान अहमदनगर दक्षिण लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी लंकेना दिलं आहे. या आव्हानाला निलेश लंके यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
सुजय विखे हे श्रीमंत कुटुंबातील आहेत, ते माझ्यासारख्या गरीब उमेदवाराची अशाच पद्धतीने टिंगल करतील, ही त्यांच्याकडे असलेल्या पैशाची मस्ती आहे असं प्रत्युत्तर देत निलेश लंके यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
निलेश लंके म्हणाले की, समोरच्या उमेदवाराकडे असलेल्या पैशाची मस्ती आहे. एका बाजूला सांगायचं की, जे सक्षम आहे त्यांनीच राजकारण करायचं, दुसरीकडे सांगायचं निलेश लंकेला इंग्रजी बोलता येत नाही. पण मी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलो आहे.
त्यामुळे मी इंग्लिश मीडियम शाळेत शिक्षण घेऊ शकलो नाही असं म्हणत अहमदनगर दक्षिण लोकसभेची निवडणूक ही गरीब विरुद्ध श्रीमंत अशी असल्याचं निलेश लंके यांनी म्हटलं. तसेच तुम्ही वैयक्तिक टीकाटिप्पणी करण्यापेक्षा पाच वर्षात काय काम केलं यावर बोला असं आव्हान देखील निलेश लंकेंनी दिलं आहे.
काय म्हणाले होते सुजय विखे?
मी जेवढी इंग्रजी बोललो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी नगरमधून उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं आव्हान सुजय विखेंनी निलेश लंके यांना दिलं होतं. ते अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.