सिल्लोड : माहेरी आलेल्या एका वीस वर्षीय विवाहित महिलेने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील सारोळा येथे घडली. या घटनेची अजिंठा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, तरुणीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. संजीवनी गौरव साळवे (वय 20, रा. वांगी) असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे.
संजीवनी ही माहेरी सारोळा येथे गेली होती. आई-वडिलांसोबत शेतात गेली. शेतातील लोकांची नजर चुकवून तिने विहिरीत उडी मारली. विहिरीत पडल्याचा आवाज येताच शेजारील नागरिकांनी धाव घेत तिला वर काढले व तातडीने सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून मृत असल्याचे घोषित केले.
25 दिवसांपूर्वी झाले होते लग्न
संजीवनीचे 25 दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. अंगावरील हळद फिटण्याआधीच तरुणीने आत्महत्या केली. तरुणीच्या मृत्यूमुळे तिचे आई-वडील, कुटुंबांसह सासरच्या कुटुंबांनाही मोठा धक्का बसला असून, या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.