नाशिक : बडगुजर ॲण्ड बडगुजर कंपनीतून निवृत्ती घेण्याविषयी सादर केलेली कागदपत्रे जर बनावट निघाली, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक कार्यालयात जाहीरपणे गळफास घ्यायला तयार आहोत, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिला. शहर पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करत असून शिवसैनिकांना नाहक त्रास देण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत.तसेच एसीबीने कागदपत्रांची पडताळणी न करताच भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केल्याचा दावा देखील बडगुजर यांनी केला.
कुख्यात सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याच्या आरोपावरून अडचणीत आलेले ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख बडगुजर यांच्या विरोधात बनावट कागदपत्रे सादर करून नाशिक महानगरपालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी एसीबीने गुन्हा दाखल करुन चौकशीसाठी हजर राहण्यासाठी त्यांना नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर, बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेत पोलीस यंत्रणेच्या कार्यपध्दतीकडे लक्ष वेधले. कंपनीतून निवृत्ती स्वीकारताना ३० लाख रुपये रक्कम ठरली होती. ती रक्कम कंपनीकडून आपणास मिळाली. भागिदारीतून बाहेर पडण्याचे करारमदार ही संपूर्ण प्रक्रिया नोंदणीकृत आहे. यातील कागदपत्रे बनावट निघाल्यास आपण जाहीरपणे गळफास घेण्यास तयार असल्याचे बडगुजर सांगितले.
या संदर्भातील सर्व कागदपत्रे न्यायालयात आहेत. त्यांची सत्यप्रत मिळण्यासाठी काही वेळ लागणार आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे हजर राहण्यासाठी काही दिवसांचा अवधी मागितल्याचे बडगजर यांनी सांगितले. मुळात हा १० वर्षापूर्वीचा विषय आहे. या काळात काही वर्षांपूर्वी आपणास एकदा चौकशीसाठी बोलाविले होते. गुन्हा दाखल करण्याआधी एसीबीने नोटीस देऊन आपले म्हणणे मांडून द्यायला हवे होते. परंतु, तसे न करता आधी गुन्हा दाखल करून मग हजर राहण्याची नोटीस दिली गेल्याकडे बडगुजर यांनी लक्ष वेधले.
.