नाशिक : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. अशातच सावतानगर येथील हनुमान मंदिर परिसरात मतदारांना पैसे वाटपाच्या संशयावरून सायंकाळी चार वाजेच्या सुमारास शिवसेना उबाठा गट आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचे बघायला मिळाले. या राड्यात दोन्ही गटांचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यासह दोन्ही गटाच्या 30 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिडकोतील सावतानगर परिसरातील हनुमान चौक परिसरात शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ठाकरे गटाचे काही पदाधिकारी मतदारांना स्लिपा वाटत होते. यावेळी महायुतीच्या तसेच भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी स्लिपा वाटपाबरोबर पैसेही वाटप केले जात असल्याची माहिती मिळाली. यानंतर भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यासह भाजपाचे काही पदाधिकारी घटनास्थळी हजर झाले.
राड्यामध्ये दोन जण जखमी..
यावेळी जोरदार शिवीगाळ करण्यात आली त्यानंतर काही वेळातच या ठिकाणी दोन्हीही गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा जमाव जमला आणि त्यांच्यामध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत दोन जण जखमी झाल्याने महायुती तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अंबड पोलीस ठाण्याभोवती गर्दी करत कारवाईची मागणी केली. दरम्यान, स्वामी विवेकानंदनगर येथे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचीही सभा होती. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला झाल्याचे समजताच त्यांनीही पोलीस ठाणे गाठून पोलीस आयुक्तांशी चर्चा करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल..
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात राडा केल्याप्रकरणी भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यासह दोन्ही गटाच्या 30 हून अधिक जणांवर अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.