जळगाव : जळगावच्या जामनेरमध्ये संतप्त जमावाकडून पोलीस स्टेशनवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या घटनेत 15 पोलीस जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. जामनेरमध्ये एका चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. दरम्यान आरोपीला आम्हीच शिक्षा देणार असल्याचं म्हणत संतप्त जमावाकडून पोलीस स्टेशनवर दगडफेक करण्यात आली.
जळगावच्या जामनेरमधील एका हृदय पिळवून टाकणाऱ्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. 11 जून रोजी जामनेर तालुक्यात एका 6 वर्षीय चिमुकलीवर 35 वर्षीय नराधामानं अत्याचार केल्यांनतर तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. घटनेनंतर 10 दिवस आरोपी पसार झाला होता. मात्र, पोलिसांनी या नराधमाला अटक केलीय.
जळगावच्या जामनेर तालुक्यातील चिंचखेडा गावात 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यानंतर नराधम पसार झाला होता. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली. बेपत्ता चिमुकलीचा शोध घेतल्यानंतर ती गावाजवळील एका केळीच्या शेतात मृतदेह आढळून आला. चिमुकलीवर अत्याचार करुन तीची हत्या केल्याचं पोलीस तपासणीत समोर आलं आहे.
10 दिवसानंतर पोलिसांनी नराधमला अटक केली. यानंतर गावातील संतप्त जमावानं आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली. आरोपीला आम्हीच शिक्षा देणार असल्याचं जमावानं म्हटलं होतं. पोलिसांनी जमावाला समजवल्यानंतरही ते ऐकायला तयार नसल्यानं जमावानं जामनेर पोलीस स्टेशनवरचं दगडफेक केली. जमावानं केलेल्या दगडफेकीत 15 पोलीस जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.