जालना : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शनिवारी (ता. १६) रात्री अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. मध्यरात्री १ वाजेपर्यंत ही चर्चा चालली. मराठा आरक्षणावर चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे. त्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न आपण करू, अशी ग्वाही अशोक चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिली. समाजाचा प्रश्न समन्वयातून सुटावा यासाठीच आपण प्रयत्न करणार असल्याचे चव्हाण यांनी या वेळी बोलताना सांगितले.
या वेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले असताना देखील मी जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. मराठा आरक्षण प्रक्रियेत मी यापूर्वीही काम केले आहे. समाजाच्या आरक्षणासाठी चर्चा करून समन्वयातून मार्ग काढणे गरजेचे आहे, असे माझे मत आहे. मी आज शासनाचा प्रतिनिधी म्हणून नाही, तर समाज म्हणून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीतून नक्कीच योग्य मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, कॅबिनेटच्या बैठकीत काय घडले हे मला माहिती नाही. सगेसोयरे अध्यादेशावर हरकती आल्या आहेत. आज आचासंहिता लागू झाली आहे. त्यामुळे त्यावरील प्रक्रिया किती पूर्ण होईल हे आताच सांगता येत नाही. समाजाचा प्रश्न समन्वयातून सुटावा यासाठीच प्रयत्न करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
मराठ्यांची पुढील दिशा काय असेल, याबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी सवाद साधला. जरांगे म्हणाले की, सरकारने फसवणूक केली आहे. सगेसोयरेची अंमलबजावणी नाही. गुन्हे मागे घ्यायचे सोडून अधिक गुन्हे दाखल केले जात आहेत. हैदराबादचे गॅजेट्स घेतले नाही. यासह समाजाच्या मागण्या, प्रश्न सरकारने अनुत्तरीत ठेवले आहेत. शासनाकडून होणारी फसवणूक अशोक चव्हाणांना सांगितली आहे. आम्ही २४ मार्च रोजी समाजाची बैठक लावली आहे. त्यात मराठ्यांची पुढील दिशा ठरेल, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.