जळगाव : जळगावमधून एक धक्कादयक बातमी समोर आली आहे. राजकारणात सक्रिय असलेले वडील प्रचारासाठी जाणार होते. यामुळे गतिमंद असलेल्या मुलीला घरात ठेवून दाराला कडी लावून ते बाहेर गेले. मात्र काही वेळाने मुलीने गॅलरीतून खाली उतरण्याचा प्रयत्न केला, यामध्ये ती तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरातील मुंदडा नगरात घडली आहे.
याबाबडत अधिक माहिती अशी की, प्रेरणा रमेश गजरे (वय १९) असे मृत झालेल्या मुलीचे नाव आहे. दरम्यान प्रेरणा ही गतिमंद असल्याने वडील रमेश गजरे तिची काळजी घेत होते. तिला कधीच एकटी सोडत नसत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांना अमळनेर येथे प्रचारला जायचे असल्याने आपण लगेच परत येऊ म्हणून जेवणानंतर प्रेरणाला घरातच राहण्याचे सांगत त्यांनी फ्लॅटच्या मुख्य दाराला कडी लावून निघून गेले.
गॅलरीमधुन उतरण्याचा प्रयत्न आणि..
वडिलांनी दार बाहेरुन बंद केल्याने घरात एकटी असल्याने प्रेरणा हिला कंटाळा आला. यामुळे बाहेर जाऊ या उद्देशाने तिने कपाटातून काही साड्या काढल्या. आणि त्या गॅलरीला बांधून खेळायला जाण्याच्या इराद्याने तिने खाली उतरण्याचा प्रयत्न केला. तसे करताना तिच्या हातातून साडी सुटली आणि ती थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळली. यातच तिचा मृत्यू झाला.
जोरात आवाज झाल्याने शेजाऱ्यांनी धाव घेतली तर रक्ताच्या थारोळ्यात प्रेरणा पडलेली दिसून आली. याबाबत तिच्या वडिलांना माहिती देण्यात आल्यानंतर ते तात्काळ आले. मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.